ब्रेकिंग न्यूज़

*नवापूर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर एलसीबीचा धाडसी छापा; 1.46 कोटींचा मुद्देमाल जप्त*

*नवापूर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर एलसीबीचा धाडसी छापा; 1.46 कोटींचा मुद्देमाल जप्त* *नवापूर एमआयडीसी भगवान भरोसे, एमआयडीसी अधिकाऱ्यांचा दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह?* नंदुरबार | प्रतिनिधी नवापूर एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणावर बनावट तूप तयार करून ते विविध नामांकित ब्रँडच्या नावाने बाजारात विक्रीसाठी पाठवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत उघड झाला आहे. या कारवाईत तब्बल १ कोटी ४६ लाख ५६ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १२ मार्च २०२६ रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, नवापूर एमआयडीसी परिसरातील एका कारखान्यात बनावट तूप तयार करून त्याची बाजारात विक्री केली जात आहे. या माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसह पंचांच्या उपस्थितीत संबंधित कारखान्यावर छापा टाकला. छाप्यादरम्यान कारखान्यात राकेशभाई ईश्वरभाई भरतिया (वय ४७, रा. सुरत, गुजरात) हा इसम आढळून आला. तपासात सदर कारखान्यात पाम तेल, वनस्पती तूप, विविध रासायनिक फ्लेवर आणि बीटा-कॅरोटीन यांचा वापर करून गायीच्या तुपासारखा रंग व वास निर्माण करत बनावट तूप तयार केले जात असल्याचे समोर आले. त्यानंतर हे तूप ORIA COW GHEE, SHUBH PREMIUM COW GHEE, LABH COW GHEE आणि RADHE KRISHNA COW GHEE या नावाने पॅक करून बाजारात विक्रीसाठी पाठवले जात असल्याचे उघड झाले. कारवाईदरम्यान पोलिसांनी पाम तेल, बनावट तुपाने भरलेले डबे, मोठ्या क्षमतेच्या स्टोरेज टाक्या, पॅकिंग मशीन, प्रिंटिंग मशीन, बॉयलर, इलेक्ट्रिक मोटर्स, गॅस सिलिंडर, रासायनिक फ्लेवर आणि इतर साहित्य असा एकूण १.४६ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपीकडे तूप किंवा पामतेल उत्पादनाचा कोणताही अधिकृत परवाना नसताना, भेसळयुक्त आणि मानवी आरोग्यास हानिकारक असे तूप तयार केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७४ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. व अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने केली. या पथकात पोउपनि विकास गुंजाळ तसेच पोलीस कर्मचारी मुकेश तावडे, मनोज नाईक, दादाभाई वाघ, विशाल नागरे, रमेश साळुंखे, सचिन वसावे, अभय राजपूत व रामेश्वर चव्हाण यांचा समावेश होता. बनावट तूप मानवी आरोग्यास धोकादायक तज्ञांच्या मते, पाम तेल, कृत्रिम रासायनिक फ्लेवर व रंगद्रव्यांचा वापर करून तयार केलेले बनावट तूप दीर्घकाळ सेवन केल्यास हृदयविकार, लठ्ठपणा, पचनाचे विकार, यकृताचे आजार आणि इतर गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे अशा प्रकारचे भेसळयुक्त अन्नपदार्थ थेट जनतेच्या आरोग्यावर घाला घालणारे ठरतात. प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह नवापूरसारख्या औद्योगिक क्षेत्रात इतक्या मोठ्या प्रमाणावर बनावट तूप तयार होत असताना अन्न व औषध प्रशासन विभाग आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांना याची खबर कशी लागली नाही, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. नियमित तपासण्या आणि देखरेखीचा अभाव असल्यामुळेच अशा प्रकारचे बेकायदेशीर कारखाने बिनधास्त सुरू राहतात का, याचीही चौकशी होण्याची मागणी होत आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे नवापूर एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली असून अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.*

Nandurbar Maharastra News @ Reporter Pakale Bhupendra Umakant

Indian Crime News

Related Articles

Back to top button