ब्रेकिंग न्यूज़

राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा,चिंचपाडा गावातील तरुणाचा मृत्यू एक गंभीर जखमी*

*राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा,चिंचपाडा गावातील तरुणाचा मृत्यू एक गंभीर जखमी* *खाजगी लग्झरी बसेसच्या भरधाव वेगाला आवर नसल्याने अपघाताला आमंत्रण* नवापूर (प्रतिनिधी) : धुळे–सुरत राष्ट्रीय महामार्गावरील चिंचपाडा रेल्वे फाट्याजवळ सोमवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात एका १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे चिंचपाडा गावात शोककळा पसरली आहे. महेश राजेंद्र निकम (वय १८, रा. चिंचपाडा) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून ऋषभ अतुल जैन (वय १८) हा गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेश निकम व ऋषभ जैन हे दोघे दुचाकीवरून जात असताना समोरून धुळ्याकडून सुरतकडे जाणाऱ्या श्रीनाथ ट्रॅव्हल्सच्या भरधाव लक्झरी बसने (क्रमांक AR-01-R-6363) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की महेश निकम याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर ऋषभ जैन गंभीर जखमी झाला. जखमी ऋषभ जैन याला तातडीने उपचारासाठी सूरत येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून फरार झाला असून या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश मोरे पुढील तपास करत आहेत. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून महामार्गावरील वेगमर्यादा व वाहतूक नियमांचे पालन करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. महामार्गवर भरधाव वेगाने चालणाऱ्या लग्झरी बसेसच्या वेग नियंत्रित करण्याची अत्यंत आवश्यकता असून मोटार वाहन निरीक्षकांनी याकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. दरम्यान चार रस्ता असूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे अपघातांना आयते निमंत्रण मिळत असून गंगापूर महालक्ष्मी होटेल ते शिवांश पेट्रोल पंप पर्यंत कोणतेही दिशादर्शक फलक लावलेले नसल्याने तसेच संपूर्ण महामार्गावर काळाकुट्ट अंधारामुळे अपघाताला तोंड द्यावे लागते असल्याची नागरीकांचे म्हणणे आहे.

Nandurbar Maharastra News @ Reporter Pakale Bhupendra Umakant

Indian Crime News

Related Articles

Back to top button