नंदुरबार जिल्हातील शहादा पंचायत समितीचा कनिष्ठ सहायक २.५० लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात* शहादा - नंदुरबार जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत पंचायत समिती, शहादा येथील कनिष्ठ सहायकाला तब्बल २ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिजित गोवर्धन भावसार (वय ४३), कनिष्ठ सहायक, पंचायत समिती शहादा, जि. नंदुरबार याने तक्रारदाराकडून २,५०,००० रुपये लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४८/२०२६ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ व ७ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे काथर्दा दिगर (ता. शहादा) येथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळातील कामांबाबत भ्रष्टाचाराची तक्रार दाखल झाल्यानंतर पंचायत समिती तळोदा येथे चौकशी करण्यात आली होती. मात्र चौकशी अहवालाबाबत जिल्हा परिषदेकडून स्पष्ट अभिप्राय मागविण्यात आला होता. या चौकशीची जबाबदारी आरोपी अभिजित भावसार यांच्याकडे होती. दरम्यान, आरोपीने तक्रारदारास २० फेब्रुवारी २०२६ रोजी पंचायत समिती कार्यालयात बोलावून चौकशी अहवाल त्यांच्या बाजूने पाठविण्यासाठी २ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी शहादा येथील हॉटेल स्पाईस अँड ग्रिलजवळ आरोपी अभिजित भावसार यांनी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. ही सापळा कारवाई पोलीस निरीक्षक विकास लोंढे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील, पोलीस कर्मचारी हेमंत महाले, विजय ठाकरे, देवराम गावित, नरेंद्र पाटील, संदीप खंडारे, जितेंद्र महाले तसेच तपास अधिकारी सुभाष पावरा यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईस प्रशांत भरते, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबार यांचे मार्गदर्शन लाभले. या घटनेमुळे पंचायत समितीतील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्यास तात्काळ तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.