ब्रेकिंग न्यूज़

आरोग्य केंद्राला कर्मचारी नसल्यामुळे शिरपूर तालुक्यातील वाडी बुद्रुक येथे गरोदर महिलेची रस्त्यावर प्रसूती

आरोग्य केंद्राला कर्मचारी नसल्यामुळे शिरपूर तालुक्यातील वाडी बुद्रुक येथे गरोदर महिलेची रस्त्यावर प्रसूती शिरपूर (धुळे): एकीकडे शासन 'सुरक्षित मातृत्व' आणि 'संस्थात्मक प्रसूती'साठी कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, शिरपूर तालुक्यातील वाडी बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्राचा अत्यंत माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. आरोग्य केंद्राचे दरवाजे बंद असल्याने एका गरीब ठेलारी महिलेला भररस्त्यात, लॉन्ड्रीच्या टपरी शेजारी बाळाला जन्म द्यावा लागला. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संताप व्यक्त होत आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील मोखळ येथील वाड्यावर राहणाऱ्या टेलरी कुटुंबातील एका महिलेला ७ मार्च रोजी पहाटे प्रसूती कळा येऊ लागल्या. कुटुंबीयांनी तातडीने सकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांना वाडी बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, तिथे पोहोचल्यावर धक्कादायक वास्तव समोर आले. आरोग्य केंद्राला चक्क opd बंद आणि एकही कर्मचारी तिथे उपस्थित नव्हता. रस्त्यावर सोसाव्या लागल्या प्रसूती वेदना महिलेला असह्य वेदना होत असतानाही आरोग्य केंद्राचे दार उघडले गेले नाही. अखेर कोणताही पर्याय न उरल्याने, आरोग्य केंद्राच्या शेजारीच असलेल्या एका लॉन्ड्रीच्या टपरीपाशी त्या महिलेला बसावे लागले. प्रसूती कळा वाढल्याने मदतीची वाट पाहत असतानाच, त्या महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाली. सुदैवाने, या परिस्थितीत महिलेने एका सुदृढ बाळाला जन्म दिला आहे. मात्र, या प्रक्रियेत मातेला आणि नवजात बालकाला मोठा धोका निर्माण झाला असता, अशी भीती व्यक्त होत आहे. ग्रामस्थांचा संताप आणि निलंबनाची मागणी शासकीय नियमानुसार आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. मात्र, ऐन आपत्कालीन वेळी केंद्र बंद असल्याने प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संताप व्यक्त केला. > "ज्या केंद्रात गोरगरिबांना आधार मिळायला हवा, तिथे बंद असणे ही लाजिरवाणी बाब आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या दोषी कर्मचाऱ्यांची तत्काळ चौकशी करून त्यांना निलंबित करावे," अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे. > प्रशासनासमोर प्रश्नचिन्ह या घटनेने आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वाडी बुद्रुक केंद्रातील कर्मचारी नेमके कुठे होते? मुख्यालयी राहण्याच्या नियमाचे उल्लंघन का झाले? आणि या गंभीर हलगर्जीपणाला जबाबदार कोण? अशा प्रश्नांच्या फैरी आता नागरिक झाडत आहेत. आता जिल्हा आरोग्य प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nandurbar Maharastra News @ Reporter Pakale Bhupendra Umakant

Indian Crime News

Related Articles

Back to top button