ब्रेकिंग न्यूज़

खळबळजनक: काहटूळ येथील महिलेचा आकस्मिक मृत्यू नसून खूनच; ६५ वर्षीय आरोपीला बेड्या

खळबळजनक: काहटूळ येथील महिलेचा आकस्मिक मृत्यू नसून खूनच; ६५ वर्षीय आरोपीला बेड्या काहटूळ (ता. शहादा) येथील राणूबाई ईशी या महिलेचा मृत्यू नैसर्गिक किंवा आकस्मिक नसून, आर्थिक व्यवहाराच्या वादातून तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ६५ वर्षीय आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, राणूबाई ईशी या ८ फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाल्या होत्या. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात मिसिंग (गहाळ) झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. शोध सुरू असतानाच, तब्बल २३ दिवसांनंतर म्हणजेच ३ मार्च रोजी गावाजवळील एका शेतात त्यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. सुरुवातीला याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. वैद्यकीय अहवालातून धक्कादायक उलगडा मृतदेहाचे शवविच्छेदन (Post-mortem) करण्यात आले असता, वैद्यकीय अहवालात धक्कादायक माहिती समोर आली. महिलेचा मृत्यू नैसर्गिक नसून, तिच्या डोक्यावर गंभीर वार करण्यात आले होते आणि गळा आवळून तिची हत्या करण्यात आली होती. या अहवालामुळे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीची कबुली स्थानिक गुन्हे शाखा आणि शहादा पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीडीआर (CDR) तपासणी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपी भिला लोटन माळी (वय ६५, रा. काहटूळ) याला ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या भिला माळीला पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पैशांच्या (आर्थिक) व्यवहारातून आलेल्या रागाच्या भरात आपणच राणूबाईंचा खून केल्याचे त्याने मान्य केले. तपास पथक घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, शहादा पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वाघ व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील पाऊल: आरोपीला १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून, या गुन्ह्यात अजून काही धागेदोरे मिळतात का, याचा तपास पोलीस करत आहेत.

Nandurbar Maharastra News @ Reporter Pakale Bhupendra Umakant

Indian Crime News

Related Articles

Back to top button