ब्रेकिंग न्यूज़

नंदुरबार जिल्यातील शहादा नगरपालिकेचा “विकासाचा निधी परत जाणार? – शिवसेना तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांचा शहादा नगरपालिकेवर थेट हल्लाबोल

“विकासाचा निधी परत जाणार? – शिवसेना तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांचा शहादा नगरपालिकेवर थेट हल्लाबोल” नंदुरबार जिल्यातील : शहादा नगरपालिकेची निवडणूक पार पडून जवळपास दोन महिने उलटून गेले असले तरी शहराच्या विकासासाठी ठोस कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. निवडून आलेले लोकप्रतिनिधी अजूनही निवडणुकीच्या राजकीय वैरातून बाहेर पडलेले दिसत नसल्याने शहराच्या विकासासाठी शासनाकडून आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना तालुका प्रमुख मनलेश ए. जायसवाल यांनी नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी शहादा नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा पार पडली. मात्र त्या सभेत मंजूर, स्थगित किंवा नामंजूर झालेल्या विषयांची अधिकृत माहिती आजपर्यंत शहरातील नागरिकांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे नगरपालिकेतील कारभाराबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे, असा आरोप मनलेश जायसवाल यांनी केला आहे. शिवसेनेला मिळालेल्या माहितीनुसार नगरपालिकेतील लोकप्रतिनिधींमध्ये असलेल्या आपसी राजकीय वैमनस्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून जैन व मुस्लिम समाजाच्या विकासासाठी आलेला तब्बल ४ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी खर्च न होता परत जाण्याची भीती आहे. याशिवाय खासदार अ‍ॅड. गोवाल पाडवी यांनी सुचविलेल्या भौतिक सुविधा पुरवण्यासाठी आलेला सुमारे १० लाख रुपयांचा निधी देखील परत जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. “शासनाकडून विकासासाठी आलेला निधी खर्च न करता परत पाठवण्याची वेळ येणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. यामुळे भविष्यात केंद्र किंवा राज्य शासनाकडून शहादा नगरपालिकेला निधी मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात,” असा इशारा देखील मनलेश जायसवाल यांनी दिला. निवडणूक संपल्यानंतर लोकप्रतिनिधींनी जात-पात, धर्म व राजकीय मतभेद बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करणे अपेक्षित असते. मात्र शहाद्यात उलट चित्र दिसत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, शहरातील नागरिक आधीच विविध समस्यांनी त्रस्त आहेत. गोमाई नदीवरील पुलाचे काम दीड-दोन वर्षांपासून रखडले आहे, तर डांबरखेडा येथील पूल जड वाहनांसाठी बंद असल्याने वाहतूक व बाजारपेठेवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. व्यापारी वर्ग आर्थिक संकटाला सामोरे जात असताना विकासासाठी आलेला निधी परत जाणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. मनलेश जायसवाल यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांना आवाहन करताना सांगितले की, “राजकीय महत्त्वाकांक्षा आणि आपसातील संघर्ष बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी तातडीने निर्णय घ्यावेत. नागरिकांच्या समस्या सोडविणे हीच आपली प्राथमिक जबाबदारी आहे.” तसेच शहरात विकासकामे प्रामाणिकपणे होत असतील तर शिवसेना त्याचे स्वागत करेल. परंतु कुठेही गैरप्रकार किंवा कायद्याविरुद्ध कामे होत असल्यास शिवसेना गप्प बसणार नाही. गरज पडल्यास जनतेसोबत तीव्र जनआंदोलन उभारण्यासही शिवसेना मागे-पुढे पाहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Nandurbar Maharastra News @ Reporter Pakale Bhupendra Umakant

Indian Crime News

Related Articles

Back to top button