नवापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सहा तलवारींसह गुजरातमधील आरोपी जेरबंद नवापूर
नवापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सहा तलवारींसह गुजरातमधील आरोपी जेरबंद
नवापूर शहरातील दिगंबर पाडवी सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बेकायदेशीरपणे तलवारी बाळगून त्यांची विक्री करणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. या कारवाईत पोलिसांनी ३ हजार रुपये किमतीच्या ६ लोखंडी तलवारी जप्त केल्या असून, गुजरातमधील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २:४० वाजेच्या सुमारास नवापूर शहरातील दिगंबर पाडवी सोसायटीकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्याच्या कडेला एक तरुण संशयास्पद रित्या तलवारींची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपीची माहिती व जप्त मुद्देमाल
• आरोपी: रोहित राजकुमार लोहार (वय २९ वर्षे), रा. कल्याणपुरा छापरा, कलोल, जि. गांधीनगर, गुजरात.
• जप्त मुद्देमाल: * ६ लोखंडी तलवारी (पात्यावर ‘सिरोही की प्रसिद्ध तलवार, ३० साल की गॅरंटी’ असे हिंदीत कोरीव काम असलेल्या).
• ६ लाल रंगाचे मखमली (वेलवेट) कापड असलेले व सोनेरी लेस लावलेले पुठ्ठ्याचे कव्हर.
• एकूण किंमत: ३,००० रुपये.
कायदेशीर कारवाई
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दिनकर रामा चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १०५/२०२६ नुसार भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ आणि ५ च्या उल्लंघनप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. श्रवण दत्त पोलीस अधीक्षक नंदुरबार, मा. अशित कांबळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक, नंदुरबार व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनात नवापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे Hc/144 किशोर वळवी, PN /842 सुरेंद्र पवार, Pc /अतुल पानपाटील त्यांच्या पथकाने केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोसई जितेंद्र महाजन करत आहेत.

Subscribe to my channel